Satara Lok Sabha 2024 : साताऱ्यात शरद पवारांचा वाघ भाजपला पुरून उरणार? शशिकांत शिंदे यांची नेमकी ताकद किती?

sharad pawar shashikant shinde
sharad pawar shashikant shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्ब्येतीचं कारण देत आपण यंदा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर पवारांच्या समोर आता साताऱ्यातून कोणाला लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं असा मोठा प्रश्न होता. अखेर आज शशिकांत शिंदे यांच्या उमेवारीची घोषणा झाली असून दुसरीकडे भाजप उदयनराजेंना उमेदवारी देईल असं जवळपास निश्चित समजलं जातंय. शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे या लढतीत कोणाचं पारडं जड जाईल? शशिकांत शिंदे उदयनराजेंना पराभूत करू शकतील का? शशिकांत शिंदे यांची साताऱ्यात किती ताकद आहे हेच आपण जाणून घेऊयात..

जिथं कमी तिथं आम्ही म्हणजेच शशिकांत शिंदे. शिंदेंच्या राजकारणाची सुरवात तशी मुंबईतील माथाडी संघटनेतून झाली. पुढे शरद पवारांनी शिंदेंना ताकद देत जावळीच्या मोहिमेवर पाठवलं. त्यानंतर शालिनीताई पाटील कोरेगाव मधून शरद पवारांना जड जायला लागल्या तेव्हा याच शिंदेंना कोरेगाव मोहीम सोपवण्यात आली. या दोन्ही मोहिमा फत्ते केलेल्या शशिकांत शिंदे यांना आता सातारा लोकसभेची अतिशय महत्वाची मोहीम देण्यात आलीय. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवणं अशी शिंदेंवर जबाबदारी आहे. तळागाळातील लोकांशी संपर्क, जिल्हाभर लोकांमध्ये असलेली ओळख, शरद पवारांशी एकनिष्ठ, पुरोगामी विचारांचं पाठबळ, माथाडी कामगारांचा पाठिंबा, अभ्यासपूर्ण वक्तृत्वशैली आणि अरे ला कारे करण्याची धमक या शशिकांत शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत. शिंदे यांचं मूळ गाव जावली खोऱ्यातील हुमगाव आहे. त्यांच्या राजकारणाचा प्रवास मुंबई ते कोरेगाव व्हाया सातारा-जावली असा झालेला असून सध्या सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. कोरेगाव भागातील एखादा लोकप्रतिनिधी आतापर्यंत साताऱ्याचा खासदार झाला नाही, त्यामुळं कोरगावकरसुद्धा या संधीची आवर्जून वाट बघत होते असं समजायला हरकत नाही.

दरम्यान हॅलो महाराष्ट्रने सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभा क्षेत्रनिहाय घेतलेल्या सर्व्हेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे श्रीनिवास पाटील यांना प्रथम तर शशिकांत शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती लोकांकडून होती. कराड भागातील लोक भाजपविषयी नाराज असून इथला मूळ काँग्रेस विचार आम्ही हारु देणार नाही अशीच त्यांची भावना आहे. पाटण भागातूनही विधानसभेला शंभूराजे आणि लोकसभेला शरद पवार सांगतील तो माणूस निवडून देऊ असा लोकांचा कल आहे. सातारा-जावली तालुक्यात सातारा भाग उदयनराजे यांच्या फेव्हरमध्ये तर जावली भाग शशिकांत शिंदे यांच्या फेव्हरमध्ये असल्याचं चित्र आहे. तर वाई-खंडाळा भागात मकरंद पाटील यांचं वजन लोकसभेच्या उमेदवाराला कामी येईल.

आता शशिकांत शिंदे आमदार राहिलेल्या कोरेगावच्या राजकारणावर एक नजर टाकू. कोरेगाव हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ. १९५२ पासूनच्या निवडणुकीत कोरेगावमध्ये शंकरराव घार्गे, विश्वास माने, तुषार पवार, आनंदराव फाळके, दत्ताजीराव बर्गे, शंकरराव जगताप, शालिनीताई पाटील, शशिकांत शिंदे, महेश शिंदे हे आमदार निवडून आले. यातील दत्ताजीराव बर्गे हे एकमेव अपक्ष आमदार. शंकरराव जगताप यांच्या आधीचे आमदार हे एखादी टर्म निवडून यायचे. शंकरराव जगताप यांनी मात्र १९७८ ते १९९९ म्हणजेच तब्बल २१ वर्षं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. वाघोली गावचे रहिवासी असलेल्या शंकरराव १९८५ ते १९९० या काळात महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपदही भूषवलं. सातारा जिल्ह्यात काँग्रेस विचार रुजवण्यात जगताप यांचा मोठा वाटा होता. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांनी इथली उमेदवारी शालिनीताई पाटलांना दिली. मागील पराभवांचा बदला घेत शालिनीताई यांनी शंकरराव जगताप यांची घौडदौड थांबवली. त्यानंतर शालिनीताई दोन वेळा कोरेगावच्या आमदार झाल्या. सातारारोड पाडळी हे शालिनीताईंचं मूळ गाव. वसंतदादा पाटील यांच्याशी दुसरा विवाह केल्यानंतर त्या अधिक चर्चेत आल्या. वसंतदादांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर त्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी काही काळ जनता दलामध्ये काम केलं. मराठा आरक्षणाची आग्रही मागणी करणाऱ्यांमध्ये त्या एक होत्या. २००६-०७ च्या दरम्यान शरद पवारांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबनानंतर २००९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणुक लढवली. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा विजय झाला.

शशिकांत शिंदे हे जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी नेते. केवळ मतदारसंघात न रमता ते पक्ष वाढवण्यासाठी राज्यभर फिरतात, मेहनत घेतात. आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे जलसंपदा मंत्री पद तसेच सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपदसुद्धा होतं. शरद पवारांचे कट्टर आणि निष्ठावान साथीदार म्हणून शशिकांत शिंदे ओळखले जातात. याच निष्ठेमुळे त्यांना अजित पवारांची नाराजी ओढवून घ्यावी लागते अशाही चर्चा आहेत. साताऱ्यातील एमआयडीसीचा विकास, अधिकाधिक उद्योगांना चालना, जिहे-कठापुर योजनेचा पाठपुरावा, जनता दरबारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणे यामुळे शशिकांत शिंदे आपलं वेगळं वजन मतदारसंघात राखून आहेत. एवढं असूनही २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. सातारा लोकसभेची पोटनिवडणुक आणि विधानसभा निवडणुक एकत्र आलेली असताना श्रीनिवास पाटील यांचा प्रचार करण्यासाठी शशिकांत शिंदे यांना जास्त मेहनत घ्यावी लागत होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करायला त्यांना वेळ मिळाला नाही. शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांना ६ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

असं असलं तरी शशिकांत शिंदे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत पुढचं काम चालूच ठेवलं. पहाटेच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीचे जे आमदार पळून जात होते त्यांना माघारी आणण्याच्या कामात शिंदे आघाडीवर होते. अजित पवार यांनी बंड केल्यानंतरही शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्धार त्यांनी केला. त्याचं बक्षीस म्हणून त्यांना विधानपरिषदेत आमदारकी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीसुद्धा त्यांचं नाव चर्चेत आलं. यासाठी अजित पवार स्वतः प्रयत्नशील होते. मात्र अनुभवाच्या जोरावर जयंत पाटलांनी ही जागा काबीज केली. असं असलं तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जाण्याऐवजी शरद पवारांसोबत राहण्याचं शशिकांत शिंदेंनी ठरवलं.

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांचा जिल्ह्यातील वैचारिक वारसा कायम ठेवण्यासाठी लढणार असल्याचं सांगितलं. तुम्हाला काय वाटतंय शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभेचे पुढचे खासदार होतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा.