लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप, अजित दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातली जागावाटपाबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती रात्री १ वाजेपर्यंत खलबतं पार पडली. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्यात जमा आहे. त्यानंतर रात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकाच विमानातून मुंबईकडे आले. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाल्याने शिंदे- पवारांची धाकधूक वाढली आहे.
कसा असू शकतो महायुतीचा फॉर्मुला –
शिंदे गटाला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईतील जागा भाजप लढवेल आणि त्याबदल्यात ठाणे आणि कल्याण या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना निवडणूक लढवेल. शिवसेनकडे असलेल्या काही जागांमध्ये बदल करण्याची सूचना अमित शहा यांनी दिली आहे. त्यानुसार, शिंदे गटाच्या उर्वरित रामटेक, पालघर, हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाला फक्त ३-४ जागा मिळू शकतात. यामध्ये बारामती, शिरूर, परभणी आणि रायगडच्या जागेचा समावेश आहे. अजित पवारांना लोकसभेला कमी जागा दिल्या असल्या तरी विधानसभेला त्याबदल्यात जास्त जागा देण्यात येतील असं आश्वासन दिल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जास्त जागांची मागणी केली असली तरी भाजपला ते मान्य नाही. शिंदे गटाच्या खासदारांबद्दल जनतेच्या मनात रोष आहे, त्यामुळे भाजपच्या तिकिटावरच जास्तीत जास्त जागा लढाव्या यासाठी अमित शाह आग्रही आहे. तसेच भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, ज्याठिकाणी विजयाची १०० % खात्री वाटते त्याचा जागा मित्रपक्षांना सोडण्यात येतील. एवढच नव्हे तर भाजपच्या काही विद्यमान खासदारांचा पत्ता सुद्धा कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.