प्रा. शिंदे खून प्रकरण: ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
औरंगाबाद – शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या एन-२ भागातील प्रा. राजन शिंदे यांचा खून होऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती अजूनही ‘क्लू’ सापडलेला नाही. याच प्रकरणात गुरुवारी विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) एका मानसशास्त्र अभ्यासकाची मदत घेण्यात आली आहे. तर एसआयटीचे दुसरे पथक तपासणीसाठी प्रा. शिंदे यांच्या गावी म्हणजेच देऊळगाव राजाला रवाना झाले होते.
एसआयटीचे एक पथक गुरुवारी (ता.१४) देऊळगाव राजाला रवाना झाले होते. संबंधित पथकाकडून मृत प्रा. शिंदे यांच्याशी संपर्कात असलेल्या देऊळगाव राजा येथील निकटवर्तीयांसह संबंधित असलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे. मृत प्रा. शिंदे याचा मुलगा हा राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या प्रथम वर्षात शिकतो. खुनाच्या पहिल्या दिवसापासून तो पोलिसांशी ‘हातचे राखून’ बोलत आहे. यामध्ये मानसशास्त्राचे काही पैलू दडलेत का? हे तपासण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मानसशास्त्र अभ्यासकांची मदत घेतली आहे.
या मानसशास्त्र अभ्यासकांच्या उपस्थितीत डॉ. शिंदे यांच्या खुनाशी संबंधितांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अभ्यासकाच्या अभिप्रायानंतर पोलिस यंत्रणेकडून त्या पद्धतीने तपास होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. खुनानंतर चौथ्या दिवशी पोलिसांनी मृत शिंदे यांच्या निकटवर्तीयांची चौकशी केली, तसेच त्यांच्या परिचित व्यक्तींचे जबाब घेत नोंदी घेतल्या. मात्र, त्यातूनही अद्याप पोलिसांना क्लू मिळालेला नव्हता.

Leave a Comment