टीम, HELLO महाराष्ट्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात १५ ते १७ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली होती. या भेटीचं ठिकाण जाहीर करण्यात आलं नव्हतं, पण गुवाहाटीमध्ये या भेटीसाठी जोरदार तयारी सुरू होती. मात्र,नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पूर्वोत्तर राज्यांमध्ये चौथ्या दिवशीही हिंसाचार सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून उसळलेल्या जनक्षोभाचे सावट जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर पडले आहे.
शिंजो आबे भारताचा नियोजीत दौरा रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या आधारे, शिंजो आबे भारताचा दौरा रद्द करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त दिलं आहे. मात्र कुमार यांनी आमच्याकडे याबाबत सध्यातरी अपडेट नाहीयेत अशी माहिती दिली. भेटीची जागा बदलवली जाईल का या प्रश्नाचं उत्तर देण्यास मी असमर्थ असल्याचंही कुमार म्हणाले आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला रात्री उशिरा मंजुरी दिली. राष्ट्रपतींनी काल रात्री उशिरा या विधेयकावर सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. त्यामुळे आता मोदी – आबे यांची भेट कधी होते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.