Shirdi Airport : शिर्डी विमानतळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ डेडलाईन

Shirdi Airport
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shirdi Airport । आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा, वेळप्रसंगी जास्तीचे मनुष्यबळ वापरा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते. नाशिक कुंभमेळा हा २०२७ ला होणार आहे. त्याच्या आधीच शिर्डी विमानतळाचा विस्ताराची कामे पूर्ण करण्याच्या सूचना फडणवीसांनी या बैठकीत दिल्या.

अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करा- Shirdi Airport

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डी येथील विमानतळावर (Shirdi Airport) नवीन हवाई वाहतूक नियंत्रण इमारत, एकात्मिक मालवाहू इमारत आणि टर्मिनल इमारतीचे काम प्रस्तावित आहे. ही कामे आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करावीत. आवश्यक असल्यास, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा. तसेच, विमानतळासाठी आवश्यक असलेले खरेदी आणि स्ट्रक्चरल डिझाइनचे काम येत्या आठवड्यात पूर्ण करावे. शिर्डी विमानतळ हे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाच्या सर्वात जवळचे विमानतळ आहे. त्यामुळे लहान विमाने पार्क करण्यासाठी शिर्डी विमानतळाचा वापर करता येईल. या संदर्भात, आवश्यक असल्यास, शिर्डी विमानतळावर सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासून अधिक जमीन संपादित करावी अशा सूचना फडणवीसांनी दिल्या.

दरम्यान, दुसरीकडे पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विमानतळासाठी लागणारी जमिन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुणे, जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुरू करावी. जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल. हे विमानतळ सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील विमानसेवेचे जाळे आणखी विस्तारणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी तातडीने कार्यवाही करावी. तसेच, तेथे मोठी विमाने उतरवण्याची सुविधा असावी, ज्यासाठी आतापासून आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. या विमानतळावर विमान हँगरची व्यवस्था देखील असावी.” महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे यांनी शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामाचे सादरीकरण केले.