Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू; भाविकांना होणार फायदा

Shirdi Airport Night Landing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) नाईट लँडिंग (Night Landing) सुविधा सुरू झाली आहे. 60 प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झालं. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचं साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केलं. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू झाल्यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक अथवा कामानिमित्त शिर्डीवरून ये-जा करणारे आता कोणत्याही वेळी प्रवास करू शकतात. त्यामुळे भक्तांसाठी हि मोठी आनंदाची बाब म्हणावी लागेल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत म्हटलं आहे की “गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) हैदराबादहून आलेल्या इंडिगो विमानाचं स्वागत केलं. हैदराबादहून सुटलेलं इंडिगो विमान रात्री ९.३१ वाजता शिर्डीच्या विमानतळावर उतरलं. यावेळी एमएडीसीने विमानातील प्रवाशांचं स्वागत केलं. हे नाइट लँडिंग महाराष्ट्राच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांसाठी सोयी आणि जगभरातील श्री साई बाबा भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी ही घटना आहे असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून – Shirdi Airport

2018 साली कोपरगाव तालुक्यातील काकडी गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Shirdi Airport) सुरू झाल्यानंतर आजतागायत हजारो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला आहे. शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण बघायला मिळतेय. दरम्यान, नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमानसंख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.