Shirur Lok Sabha 2024 : शिरूरमध्ये आढळरावांची आघाडी, अमोल कोल्हे गॅसवर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा एडवांटेज असतानाही अमोल कोल्हेंमुळे (Amol Kolhe) तुतारी धोक्यात आलीय. तर शिवसेनेतून शिंदे गटात आणि उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेल्या… पक्ष बदलाचा शिक्का पडलेल्या… आढळरावांचं वजन मात्र त्यांना यंदा खासदारकीचा चौकार मारून देणार. होय, आम्ही जे काही बोलतोय त्या कुठल्या हवेतल्या गोष्टी नाहीयेत. तर ही आहे ग्राउंड रियालिटी. अमोल कोल्हे हे नाव मागच्या पाच वर्षांपासून राजकारणात लाईमलाईटमध्ये राहिलं… त्यांची संसदेतील भाषणही गाजली… पण असं असूनही शिरूरच्या जनतेलाच आपला खासदार काही पचनी पडेना झालाय. त्यापेक्षा कोल्हेंच्या आधी तीन टर्म खासदार राहिलेल्या आढळरावांवरचा(Shivajirao Adhalrao Patil) विश्वास मात्र कणाकणाने वाढत चाललाय. शरद पवारांनी उभ्या केलेल्या सर्वच मतदारसंघांमध्ये तुतारी फॉर्ममध्ये असताना शिरूर मध्ये ती कशी धोक्यात आलीय? याला बदलत्या राजकारणासोबतच स्वतः अमोल कोल्हे कसे जबाबदार आहेत? आढळराव यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटी उड्या घेतल्या तरी त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त का आहेत. हेच थोडंसं साध्या सोप्या भाषेत सांगतोय…

तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत महाराष्ट्रात दोनच ठिकाणी होतेय. पहिली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत. आणि दुसरी बारामतीलाच लागून असणाऱ्या शिरूरमध्ये… बारामतीचा निकाल सात तारखेलाच ईव्हीएममध्ये बंद झालाय. त्यामुळे आता लक्ष लागलंय ते म्हणजे शिरूर मध्ये काय होणार? बारामतीच्या सगळ्या प्रचाराचा फोर्स शिरूरकडे शिफ्ट झालाय. अजित दादा, शरद पवार यांनी एकामागून एक शिरूर मध्ये सभांचा धडाका लावलाय. पण मागच्या दहा दिवसांपासून वारं हे तुतारीच्या विरोधात फिरलंय…

Shirur Lok Sabha : Amol Kolhe यांना गायब खासदार म्हणून टोमणे दिले जातायत.

आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे कोल्हेंचा शिरूरमधला कमी जनसंपर्क…

अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून पुन्हा तिकीट देण्यात आलं. त्यांचा प्रचारही सुरू झाला. पण काही गोष्टी सारख्या कानावर पडत होत्या. खासदार साहेब, 2019 पासून आमच्याकडे फिरकलेच नाहीत… आमच्या गावात पायच ठेवला नाही… अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले. तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं? असा थेट प्रश्न कोल्हेंना विचारण्याची धमक गावकऱ्यांनी दाखवली? यावरून एक चित्र स्पष्ट दिसतं ते म्हणजे शिरूरमध्ये अमोल कोल्हेंचा कमी जनसंपर्क होता. विरोधकांनीही हीच लाईन मोठी करत कोल्हेंना प्रचारातून चांगलंच झोडलंय. हा माणूस कधी मतदारसंघात फिरकत नाही, विकास काम करत नाही, याला फक्त अभिनय क्षेत्राची आवड आहे. पण आता आम्हाला अभिनेता नकोय नेता हवाय…अशा भाषेत ते कोल्हेंना बॅकफुटला टाकतायत. याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हेंकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत विकासकामं सोडली तर इतर कोणतीही काम त्यांना सांगता येत नाही. थोडक्यात हुशार खासदार असूनही निष्क्रियतेचा ठपका त्यांच्यावर बसलाय. त्यामुळेच शिरूरमध्ये तुतारी धोक्यात आलीय.

दुसरं कारण ठरतं ते म्हणजे अमोल कोल्हेंची धरसोड प्रवृत्ती.

खासदार झाल्यानंतर काही दिवसातच कोल्हे आपल्याकडे येऊन मला राजीनामा द्यायचा आहे, असं म्हणाले होते. अभिनय क्षेत्राला वेळ देता येत नाही याचं कारण पुढे करून ते राजकारणातून संन्यास घेणार होते, असा किस्सा सांगून अजितदादांनी नवा बॉम्ब फोडला. त्यानंतर मधल्या काळात कोल्हेंचं पक्षाच्या सभांना, महत्त्वाच्या मीटिंगांना दांडी मारणं, मतदार संघातून महिनोमहिने गायब असणं आणि तितक्यातच भाजपच्या जवळ जाणं या सगळ्या गोंधळामुळे त्यांच्याविषयी मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या तारखाही समोर येऊ लागल्या… पण खूप दिवसांच्या मौनानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादीतच कायम राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं. पुढे अजितदादांनी बंड केलं तेव्हा त्यांच्या शपथविधीला कोल्हेही हजर होते. पण नंतर मात्र त्यांनी यु टर्न घेत आपल्याला याची काही कल्पना नव्हती, असं कव्हर करून शरद पवार गटाचा रस्ता धरला. या सगळ्या आधीचा शिवसेनेतला त्यांचा राजकीय वावर आपल्याला माहित आहेच. थोडक्यात काय तर अमोल कोल्हे मागच्या पाच वर्षात अनेक दगडांवर पाय ठेवताना दिसले. त्यांची कोणतीही एक ठाम भूमिका नसल्याने या सगळ्यात मतदार संघातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या यांना हरताळ फासलं गेलं. अजित पवार कोल्हेंच्या अशा अनेक खासगी गोष्टी पब्लिकली सांगून तुतारीला डॅमेज करतायत. आणि हीच गोष्ट कोल्हेंना विजयापासून लांब घेऊन चाललीय…

तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे अमोल कोल्हेंची कमी झालेली क्रेझ…

अमोल कोल्हे जेव्हा निवडणुकीला उभे राहिले होते. तेव्हा त्यांची स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका घराघरात पोहोचली होती. त्यातील कोल्हेंनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेनं अमोल कोल्हे या नावाची क्रेझ होती. त्यामुळेच मोदी लाट असताना, सलग तीन टर्म निवडून जाण्याचा अनुभव असताना आणि तळागाळाशी चांगला कनेक्ट असताना देखील आढळराव निवडणूक हरले.. आणि कोल्हेंची सरशी झाली… या सगळ्यात दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी कोल्हे निवडून यावेत यासाठी केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा राहिला होता. मात्र 2024 ला परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील कोल्हेंचे विरोधक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हे यांच्या अभिनयाची क्रेझ पूर्णतः मावळलेली आहे. त्यामुळे शरद पवारांविषयी असणारी सहानुभूतीची लाट आणि आपल्या कारकिर्दीत केलेली काम एवढंच काय कोल्हेंच्या हाताशी राहत. मात्र याच्या जीवावर आपली सारी यंत्रणा कामाला लावलेल्या आढळरावांचा पराभव करणे कोल्हेंना सध्या तरी अशक्य वाटतंय. त्यामुळेच शिरूरमध्ये तुतारी धोक्यात आलीये, हे ठामपणे बोलायला स्कोप उरतो.

दुसऱ्या बाजूला निवडणूक हरले असले तरी आढळरावांनी तळागाळातील आपला शेवटचा कनेक्ट कमी होऊ दिला नाही. मतदारसंघातील सामाजिक कामं आणि कार्यकर्त्यांची ॲक्टिव्ह यंत्रणा हे आढळरावांचं राजकारण प्लसमध्ये घेऊन जाणारच होतं. पण त्यासोबतच आता याला घड्याळाची जोड मिळाल्याने आढळराव चौथ्यांदा दिल्लीत जातील याचे चान्से जास्त आहेत. हे सगळं विश्लेषण पाहता शिरूरमध्ये सहानुभूतीच्या लाटेचा इफेक्ट होऊन तुतारी वाजणार की आढळरावांच्या बेरजेच्या राजकारणाला यश येऊन ते खासदारकीचा चौकार मारणार? तुम्हाला काय वाटतं? शिरूरचा पुढचा खासदार म्हणून तुम्हाला कुणाला पाहायला आवडेल? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.