कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिरवडे- मसूर ग्रामीण मार्ग क्रं. 318 हा गेल्या तीन ते चार महिन्यापासुन हेतु परस्पर बंद करण्यात आला आहे. याबाबत सरपंचांना तोंडी तक्रार दिली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी निवेदन दिले, तरी यंत्रणा हलेना अशावेळी आंदोलनाचा इशारा देताच यंत्रणा पळू लागली. शिरवडे येथील 400 ते 500 शेतकऱ्यांची शेती असलेला रस्ताच बंद केला आहे. त्यामुळे शेतात उभा असलेला ऊस तोड मिळून तुटेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा रस्ता खुला करून द्या, अशी मागणी भूमि अभिलेख कार्यालयाकडे शिरवडे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
शिरवडे येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी फेरतपासणी केली आहे. यावेळी सरपंच अनिल जगदाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, पोलिस पाटील ताजुद्दीन संदे, तळबीड पोलिस श्री. फडतरे, भूमिलेखचे श्री. कांबळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विक्रांत शिंदे यांच्यासह गावातील 100 ते 150 शेतकरी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे म्हणाले, शिरवडे- मसूर मार्ग 318 नंबर गेल्या चार महिन्यापासून बंद आहे. सदरचा रस्ता बंद असल्या कारणाने या परिसरातील 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना त्रास होत आहे. सध्या उसाला तोडी सुरू आहेत, परंतु तोड येऊन सुद्धा रस्ता नसल्याने ऊस तोडला जात नाही. याबाबतची माहिती गावच्या ग्रामपंचायत, तहसीलदार, प्रांत कार्यालया सोबत हा रस्ता ज्या विभागाच्या अंतर्गत येतो. त्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला आणि पोलीस ठाण्याला माहिती दिली होती. परंतु अशावेळी सर्व विभागांनी आपले हात झटकण्याचे काम केले. अखेर गावातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या मारण्याचा इशारा दिला. त्यानंतर अखेर बांधकाम विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाला पुन्हा एकदा सदरील जागेची व रस्त्याची मोजणी व पाहणी करण्याचे सूचना दिल्या.
अधिकाऱ्यांचा रस्ता शेतकऱ्यांनी अडविला
आज भूमि अभिलेखचे अधिकारी यांनी स्थळपाणी केली आहे. तसेच लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय व्हावा, अशी भावना सर्वांचीच आहे. परंतु लोकांच्या हक्काचा रस्ता मिळाला पाहिजे.या प्रकरणात प्रत्येकाने बघ्यांची भूमिका घेतल्याने आजपर्यंत हा प्रश्न रखडत गेला आहे. आज भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकारी श्री. भोसले यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी अखेर लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे स्थळपाणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना जाऊन दिले आहे. अन्यथा जोपर्यंत मार्ग निकालात निघत नाही तोपर्यंत तिथून अधिकाऱ्यांना जावू देणार नाही, असा पवित्रा उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला होता.