शिवभोजन योजनेला मिळाला मुहूर्त; २६ जानेवारीपासून १० रुपयात मिळणार जेवण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । शिवसेनेच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी होणार आहे.याबाबतची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आपल्या खात्याच्या आढावा बैठकीत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.

भुजबळ म्हणाले, ”शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण यांचा समावेश असणारा आहे.हे जेवण १० रुपये अशा अत्यंत किफायतशीर दरात देण्यात येईल. या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करुन वाजवी दरात आवश्यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करुन देणार आहे. सार्वजनिक वितरणासाठी आवश्यक असलेली साठवणूक क्षमता आधुनिक व सक्षम करणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकेत, महिला सक्षमीकरणासाठी शिधापत्रिका कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याची निवड करणार आहे.

या योजनेच्या पूर्ततेनंतर राज्यभरातील गरीब, गरजू नागरिकांना मुबलक दरात जेवण उपलब्ध होणार असून. शिवसेना आपल्या जाहीरनानाम्यातील वचनपूर्ती या योजनेच्या माध्यमातून करणार आहे. गतकाळात १९९६ साली शिवसेनेने सरकारमध्ये असतांना १ रुपयांत झुणका भाकर योजना अंमलात आणली होती. या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आता शिवथाळीच्या रूपात शिवसेना पुन्हा एकदा सामान्य जनतेत लोकप्रिय अशी योजना घेऊन जात आहे.

Leave a Comment