वसई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळील वसईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखाच्या मुलाने रिक्षाची धडक का दिली याचा जाब विचारल्याच्या रागातून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
नालासोपारा पूर्व नगीनदास पाडामधील माजी शिवसेना शाखा प्रमुख गणेश मेधेकर यांचा मुलगा सागर मेधेकर याने एका व्यक्तीला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. किरकोळ वादातून आरोपी सागर मेधेकर याने अब्दुल हाफिज नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. माजी शिवसेना शाखा प्रमुख यांचा मुलगा सागर हा रिक्षाचालक आहे.
जखमी अब्दुल हाफिज हे आपल्या मुलाला ट्युशन क्लास मधून घरी परत घेऊन जात असताना सागर मेधेकर याने हाफिज यांना रिक्षाने धडक दिली. त्यामुळे अब्दुल हाफिज यांनी सागर मेधेकर याला धडक का दिली म्हणून विचारणा केली. त्यामुळे रागाच्या भरात सागर मेधेकर याने हाफिज यांना बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात अब्दुल हाफिज यांना गंभीर दुखापत झाली असून विरार महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी आरोपी सागर मेधेकर याला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.