पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज पाटण तालुक्यातील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे शांततेत व उत्साहात मतदानास सुरुवात झाली. निवडणुकीच्या निमित्ताने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मतदार संघही महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी मात्र, शिवसेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान आहे. दरम्यान आज सकाळी गृहराज्यमंत्री देसाई व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळत आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या हातात हात घालून सरकार चंगळत आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वेगळेच चित्र आहे. या ठिकाणी शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.
दरम्यान आज सकाळी साडे नऊच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजितसिंह पाटणकर टूरवर गेलेल्या मतदारांसह मतदान केंद्रावर दाखल झाले. तसेच मतदानाचा हक्क बजावला. तर साडे दहा वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई आपल्या समर्थकांसह दाखल झाले आणि त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदान केंद्र परिसरात कोणता अनुचित प्रकार घडू नये मुणून उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.