शिवसेना नेते, मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार, किरीट सोमय्या दापोली पोलिस ठाण्यात आज तक्रार देणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चाैकशी अहवाल मागविल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. तशी माहिती ट्वीट करुन भाजप नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी दिलीय. त्यानंतर आज बुधवार 2 जून रोजी दुपारी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

अनिल परब दापोली साई रिसॉर्ट घोटाळाची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटीचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम येईल. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्वीट करत सोमय्या यांनी परब यांच्याविरोधात गंभीर आरोप केला होता.

बुधवारी 2 जून रोजी सकाळी ट्वीट केले आहे. त्यात मी आज दुपारी १२.३० वाजता दापोली पोलिस स्टेशनला अनिल परब साई रिसॉर्ट विरूध्द भारतीय दंड संहिता कलम 420…पर्यावरण संवर्धन अधिनियम कलम 15 महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53, 54, 55, 56, 56 (अ), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 45 अंतर्गत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.