औरंगाबाद | शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी तत्कालिन माजी खासदार विद्यमान आमदार प्रदिप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एम. भोसले यांनी सहा महिन्याची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दोषारोप पत्रानुसार तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुद्दाम त्रास, देता त्यांना विनाकारण अटक करता असे म्हणत प्रदीप जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता.
काय आहे प्रकरण
शहरात निर्माण झालेल्या दंगल सदृष्य परिस्थितीत क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर भागातील दोन शिवसैनिकांना अटक केली होती. त्यावेळी २० मे २०१८ रोजी रात्री अकरा वाजता प्रदीप जैस्वाल पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसाना जाब विचारला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक केली, त्यांना तात्काळ जामिनावर सोडा, अशी मागणी करत जैस्वाल यांनी गोंधळ घातला. त्यावेळी ड्युटीवरील ठाणे अंमलदार चंद्रकांत पोटे, उपनिरिक्षक संजय बनकर, श्री. अकमल यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.
मात्र आताच तुमच्या वरिष्ठांना बोलवा म्हणत आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच टेबलवरील काच फोडली आणि खुर्च्यांची फेकाफेक केली होती. त्यानंतर सहाय्यक निरिक्षक विजय घेरडे पोलिस ठाण्यात आले, त्यांनीही प्रदीप जैस्वाल यांना समजावून सांगीतले. दरम्यान सात- आठ शिवसैनिकांनी जैस्वाल यांची समजूत घालून त्यांना परत नेले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात मुख्य सरकारी वकिल अविनाश देशपांडे यांनी पाच जणांच्या साक्ष नोंदवल्या. सुनावणीनंतर जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एम. भोसले यांनी प्रदिप जैस्वाल यांना कलम ३५३ अन्वये सहा महिन्याची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये सहा महिने व अडीच हजार रुपये अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात ॲड अविनाश देशपांडे यांना ॲड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून एस. के. घुगे यांनी काम पाहिले