आम्ही येथून फक्त निषेधाचे खलिते पाठवतो”; शाई फेकप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव येथे काल महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर अज्ञातांनी शाई फेक केली. या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने आज (मंगळवारी) बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही इथून फक्त निषेधाचे खलिते पाठवतो. सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्याविषयी कठोर पावले उचलायला हवीत, असे म्हंटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सुरू झाले आहे. त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी कन्नड वेदिका रक्षण समितीचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांना चर्चा करायचे असल्याचे सांगून बाजूला नेले. तेथे त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले होते.

दळवी यांच्यावर ज्याप्रकारचा हल्ला झाला त्याचा फक्त महाराष्ट्र सरकारने निषेध करुन चालणार नाही. सातत्याने तिथे मराठी बांधवांवर, समितीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असतात. जे दोन मंत्री सीमाप्रश्नासाठी खास नेमलेले आहेत त्यांनी बेळगावला जावून समितीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली पाहिजे. या घटनेला जबाबदार बेळगावची मराठी जनता सुद्धा आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकजूट दाखवली नाही. भाजपाला विजयी केले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्रव्देष्ट्यांचे बळ वाढले आणि त्यातून असे हल्ले सुरु झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment