शिवसेनेत खांदेपालट : शेखर गोरे नवे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनंतर खासदारांनाही शिवसेनेत गळती लागली. अजुन देखील शिवसेनेतील अनेक नेते बाळासाहेबांची शिवसेनामध्ये जाताना दिसतात. अशात जिल्हा पातळीवरही याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे साताऱ्यात जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर खांदेपालट करण्यात आली आहे. नितीन बानुगडे यांना या पदावरून हटविले असून त्याच्या जागी शेखर गोरे यांची नियुक्ती केली आहे.

बऱ्याच वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून प्रा. नितीन बानगुडे- पाटील यांच्यावर जबाबदारी होती. परंतु या काळात पक्षाची म्हणावी तशी घोडदौड होऊ शकली नाही. उलट पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे जिल्ह्यातील अनेक पदाधिाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. या नंतर अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. सातारा जिल्ह्यातील नुकसान थांबवण्यासाठी अखेर आता पक्षाने जिल्हा संपर्क प्रमुख पदी जिल्ह्यातील युवकांचे मोठे संघटन असणारे माण- खटाव तालुक्यातील शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांची निवड केली आहे. तर नितीन बानुगडे पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील खांदेपालटीमुळे आता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भरारी घेईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्य स्थितीत आक्रमक चेहरा पाहिजे होता, तो शेखर गोरे यांच्या रूपाने मिळाला आहे. परंतु आगामी काळात त्याच्या कामावर ही निवड योग्य की आयोग्य हे ठरणार आहे.