सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कराड तालुक्यातील करवडी येथील गो- पालन केंद्रात गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांना स्थानबध्द करून ठेवले आहे. पंढरपूरला चालत वारी करण्यास सरकारने परवानगी नाकारली असताना शिवसेनेचे आमदार महेश शिंदे व ह. भ. प. घनश्याम महाराज नांदगावकर यांनी टाळ-मृदुंग यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात वारकऱ्यांना पंढरपूरला वारीला जाण्यासाठी परवानगी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या वारी संदर्भातील निर्णयाला शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी एकप्रकारे निषेध करत आव्हान दिले आहे.
ह. भ. प. घनश्याम महाराज नांदगावकर म्हणाले, बंडातात्या कराडकर यांना स्थान बंदीतून प्रशासनाने मुक्त करावे आणि त्यांना काही वारकऱ्यांसोबत पंढरपूरची वारी करण्यासाठी जाण्यास परवानगी द्यावी यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी आले आहे. परंतु असे असताना शासन आम्हाला दाबत असून अनेक प्रकारचे निर्बंध लादत आहेत. मला कराडच्या पोलिसांनी स्थानबध्द केले होते.
आ. महेश शिंदे म्हणाले, बंडातात्या कराडकर यांनी वारी संदर्भात काही निर्णय घेतला होता. कोरोनाच्या महामारीमुळे प्रशासनाने वारीचा निर्णय हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. सध्या सर्वत्र निवडणुका मोठ्या प्रमाणावर होत आहेत. केवळ वारकरी साप्रदायाच्या प्रमुखांना आषाढी वारीला जावून देण्यास परवानगी दिली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. बंडातात्या कराडकर यांना स्थानबध्द केले आहे, त्यातून मुक्त करावे. तसेच काही वारकऱ्यांसोबत बंडातात्या यांना पंढरपूरला वारीला जाण्यास परवानगी द्यावी.