हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वात मोठा निकाल जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सर्व याचिका फेटाळून लावत एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले आहे. तसेच भरत गोगावले यांचा व्हीप वैध असून सर्व 16 आमदार पात्र असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. नार्वेकर यांनी दिलेल्या या निकालामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
आजच्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य केलेले नाहीत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र मान्य धरण्यात आलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. तसेच उद्धव ठाकरे यांनी 2018 मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं मत राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे.
त्याचबरोबर, “पक्षप्रमुखाचे मत म्हणजे पक्षाचे मत असू शकत नाही. पक्षप्रमुख गटनेता पदावरून काढून टाकू शकत नाही. कारण पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे” असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. आजच्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आता हा निकाल समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहेत.