ठरलं तर!! या दिवशी आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार; कोल्हेंविरोधात दंड थोपटणार

Shivaji Adhalrao Patil NCP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) हे शिरूर मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या, मात्र आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या २६ मार्चला आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच शिरूर मध्ये आमचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, शिरूर आंबेगाव भागातच आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश होईल. अतिशय नेत्रदीपक असा हा पक्षसोहळा होणार असून प्रचाराचा शुभारंभ म्हंटल तरी काही हरकत नाही. आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे फक्त शिरूरच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आम्हाला फायदा होणार आहे, आढळराव यांचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेकांशी व्यक्तिगत संबंध आहेत, त्यामुळे आम्हाला फायदाच होणार आहे. ज्याअर्थी त्यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याला आम्ही पक्षात घेतलं त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असं म्हणत तटकरेंनी आढळराव यांच्या उमेदवारीचे थेट संकेत दिले. तसेच आम्ही शिरूरमध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकून येऊ असेही त्यांनी म्हंटल.

पुन्हा कोल्हे विरुद्व आढळराव

दरम्यान, २०१९ प्रमाणे पुन्हा एकदा शिरूर मध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Kolhe Vs Adhalrao) यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत शिरूरकराना अनुभवायला मिळेल. २०१९ मध्ये अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढून त्यावेळी शिवसेनेत असलेल्या आढळरावांचा ५८,४८३ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी प्रथमच लोकसभा लढवलेले अमोल कोल्हे तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते. आत्ताही त्यांची लोकप्रियता अशीच टिकून असून शिरूरमध्ये पुन्हा कोल्हे विरुद्व आढळराव असा हाय वोल्टेज सामना रंगणार आहे.