संशोधन म्हणजे ज्ञान शोधण्याची कला- कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
विज्ञान हे संशोधनाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रत्येकजण प्रत्येक वेळेस संशोधन करीत असतो. संशोधन म्हणजे ज्ञान शोधण्याची कला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागामार्फत राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान सप्ताहाच्या सांगता समारंभामध्ये अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ.शिंदे बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. शिंदे पुढे म्हणाले, विविध भाषांमध्ये विज्ञानाचे विपूल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे, याचे विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक आहे. विज्ञान दिनाचा मूळ हेतू हा समाजामध्ये वैज्ञानिक जाणीव जागृत निर्माण करणे हा आहे. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन रूजविण्यासाठी सातत्याने विविध वैज्ञानिक संशोधनात्मक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. समाज घडविण्यामध्ये विज्ञानाचे फार मोठे योगदान आहे विज्ञानातील विवेकपूर्ण विचार हे समाजाला अंधश्रध्देपासून दूर ठेवण्याचे मूख्य काम करीत असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक संशोधक लपलेला असतो. संशोधक वृत्तीचे कार्य पूर्ण होण्यासाठी त्याला पूरक वातावरण उपलब्ध होणे आवश्यक आहे. प्रश्नाचे उत्तर शोधणे म्हणजे संशोधन. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रीया आहे. संशोधनामुळे माणूस सक्षम बनतो. प्रश्न विचारण्याचे थांबविल्यास ज्ञानार्जन थांबते, विकास थांबतो. जी व्यक्ती विज्ञानवादी जीवनशैली अवलंबीते ती व्यक्ती आनंदी जीवन जगू शकते. विज्ञानाच्या माध्यमातून मन, मनगट आणि मेंदू बळकट करणे हा खरा आपला प्रगतीचा मार्ग आहे.

आपल्या मनोगतामध्ये प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, भारतीय महिला शास्त्रज्ञांचे विज्ञानामध्ये फार मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू, अभ्यासू, चिकित्सक वृत्ती जोपासून समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. यावेळी अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, विद्यार्थीनी स्वरूपा फडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment