ज्योतिरादित्य शिंदेच्या मदतीने मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहानांची खुर्ची मजबूत; पोटनिवडणुकीत भाजपाची विजयी वाटचाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून असताना मध्य प्रदेशातील २८ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. शिवराज सिंह चौहान यांना सत्ता टिकवण्यासाठी पोटनिवडणुकीत ८ जागांची गरज आहे. निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १३ जागांवर तर काँग्रेस ७ आणि बसपा १ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

मध्यप्रदेशातील २८ जागांसाठी ३५५ उमेदवार उभे होते, विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकार सुरक्षित असल्याचं चित्र होतं, मात्र या निवडणुकीत काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ऐन कोरोना काळात काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला. ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचं कमलनाथ सरकार कोसळलं, राजीनामा दिलेल्या आमदारांच्या जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यात प्रामुख्याने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना भाजपाने तिकीट दिले होते, त्यामुळे या नेत्यांना निवडून आणण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदेनी कंबर कसली होती.

काँग्रेसच्या २५ आमदारांनी राजीनामा दिला होता. तर तीन आमदारांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेस फोडून भाजपात आलेल्या २५ आमदारांना भाजपाने पुन्हा तिकिट दिले होते. यापैकी १४ जण शिवराज सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्ता टिकविण्यासाठी भाजपाला केवळ ८ जागा हव्या आहेत. तर काँग्रेसला २८ पैकी २८ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मात्र सर्व जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता फार कमी आहे. निकालाच्या कलांमध्ये १३ जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर ७ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in