सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा पालिकेतील विकास कामांवरून दोन्ही राजेंकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान आता सातारा शहरात होत असलेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार करत हप्तेगिरी केली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. सातारा पालिकेची विकासकामे ही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सातार्यात विकासकामे सुरु असून त्यासाठी सत्ताधार्यांकडून कमिशन, हप्ते घेतले जात असल्याचा आरोप शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी केला आहे.
नगर विकास आघाडीचे नेते आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा पालिकेत सुरु असलेल्या राजकारण व शहरातील विकासकामाबाबत आपली भूमिका मंडळी. यावेळी ते म्हणाले की, सध्या सातारा शहरात विकास कामे सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या फंडासाठीच रखडलेली कामे तातडीने मार्गी लावा असे नेत्यांकडून सांगितले जात आहे का? बायोमायनिंग प्रकल्प राबवूनही डेपोवर कचर्याचे साम्राज्य का आहे? सातारा पालिकेत घंटागाडीच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/390378366339711
पाच वर्षात सातारा विकास आघाडीचा नियोजनशून्य कारभार सुरु आहे. कास धरणाच्या उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. मात्र अतिरिक्त पाणीसाठ्याचा वापर होण्यासाठी नवी पाईपलाईन टाकून त्या माध्यमातून पाणी आणण्याचे कोणतेही नियोजन झालेले दिसत नाही. कासची उंची वाढली, धरणाचा साठा वाढला तरीही वाढीव पाणीसाठ्याचा उपयोग सातारकरांना तूर्त तरी होणार नाही. पत्र देणे, फोटो काढणे एवढ्यावरच विषय थांबला आहे.
सातारा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना खा. उदयनराजे भोसले यांनी विकास कामे तातडीने सुरू करा, असे आदेश दिले आहेत. मुळात हे रस्ते सातारकरांसाठी होतात की ठेकेदारांसाठी होतात. आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांना फंड गोळा करण्यासाठी कामे होतात का? खा. उदयनराजेंनी शहरातील रस्त्यांची कामे सुरू करा असे सांगितले. पण, मे महिना निम्मा संपत आला आहे. पावसाळा तोंडावर आला असताना डांबरीकरण करा असे सांगणे म्हणजे रस्ते सातारकरांसाठी की ठेकेदारांसाठी होतात? असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार
पावसाळ्यात केलेले डांबरी रस्ते टिकणार नाहीत. निवडणुकीआधी ठेकेदाराकडून पैसे गोळा करायचे हे त्यांच्या डोक्यात दिसत आहे. टक्केवारी गोळा करणे, घंटागाड्याचे हप्ते याकडेच सातारा विकास आघाडीचे लक्ष आहे. पैसे गोळा करायचे हाच त्यांचा उद्योग आहे. याप्रकरणी माहिती घेवून जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.