बामणोली प्रतिनिधी | कसबे बामणोली येथे जावली व महाबळेश्वर या दोन तालुक्यातील १०५ गावच्या खोऱ्यातील धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज सातारा जावलीचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोयना पुनर्वसन कार्यालयात गेली वर्षानुवर्षे काम करणारे प्रशासकीय अधिकारी यांची कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत मानसिकता खराब झाली असून त्यांना बुरशी लागल्याचा प्रकार झाला आहे. मी स्वतः येत्या अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवनार आहे. डॉ. भारत पाटणकर यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करून आपण आपल्या मागण्या पूर्ण करूनच घेऊ अशी बुलंद घोषणा शिवेंद्रराजे यांनी केली.
धरण होऊन साठ वर्षे उलटून गेली. तीन पिढ्यांना या मागण्या मागतच जगावे लागले. किती वर्षे आंदोलने करत बसायचं? असा संतप्त सवाल विचारत आता माग हटायच नाय आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय गप्प बसायचं नाय हि भूमिका आमदारांनी मांडली. या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून सुरू असणाऱ्या आंदोलनाकडे प्रशासनातील एकाही अधिकाऱ्यांने ढुकून न बघितल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी खेद व्यक्त केला. यावेळी जावली महाबळेश्वर १०५ गावामधील आंदोलनकर्ते तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते