शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ‘या’ आमदाराच्या विरोधात बॅनरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘सत्तेसाठी ससाणे साहेब, विखे साहेब, थोरात यांना फसवणाऱ्या गद्दार व बिनकामाच्या आमदाराला पाडायचं, असा मजकूर असलेले बॅनर शहरभर झळकले आहेत. भाऊसाहेब कांबळे जनसामान्यामध्ये मिसळून राहणारा माणूस म्हणून श्रीरामपूरच्या जनतेही त्यांना सतत साथ दिली. मात्र, भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ससाणेंची साथ सोडत महाआघाडीत प्रवेश केला. तेव्हापासून ससाणे गट कांबळे यांच्यावर प्रचंड नाराज आहे. स्व. जयंत ससाणेंना खऱ्या अर्थाने कांबळेची साथ हवी असताना त्यांनी सोडलेला हात ससाणेंच्या जिव्हारी लागला होता.

विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे यांना विखे पाटील यांनी यावेळी लोकसभेची काँग्रेसची उमेदवारीही दिली होती. मात्र, सुजय विखे यांच्या जागावाटपाच्या आणि भाजपा प्रवेशाच्या घडामोडीमुळे विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिलेला असताना त्यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला आणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवली.

या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांचा दारूण पराभव झाला. स्वतःच्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातही कांबळे आघाडी मिळवू शकले नाही. आता आपण कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार होणार नाही, अशी कांबळेची धारणा झाल्याने कदाचित त्यांनी शिवबंधन बांधले आहे. मात्र, शिवसैनिकही त्यांची साथ देत नसल्याचे दिसते.