हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivjayanti 2024) संपूर्ण महाराष्ट्राचे आद्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज राज्यभरात तारखेनुसार शिवरायांची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हा दिवस एखाद्या उत्सवासारखा जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गायले जाते, देखावे उभारले जातात, भव्य रॅलीचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते आणि आज तारखेनुसार जयंती आहे.
या दिवसाची शिवप्रेमी आणि शिवभक्त मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी राज्यभरात विविध पद्धतीने आनंद साजरा केला जातो. केवळ कार्यक्रमांचे आयोजन नव्हे तर भव्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला स्मरण केले जाते आणि त्यांना नमन केले जाते. (Shivjayanti 2024) त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी अनेक शिवप्रेमी हे महाराष्ट्रातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ल्यांवर गर्दी करताना दिसतात. यांपैकी काही महत्वाच्या किल्ल्यांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवताना छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्यांची साथ लाभली आणि इतिहासात ज्या किल्ल्यांचा विशेष उल्लेख आहे त्या शिवनेरी, तोरणा, पन्हाळा आणि सिंहगडाविषयी आपण माहिती घेणार आहोत. या किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आज शिवरायांच्या जयंतीनिमित्त या खास किल्ल्यांची आठवण करून देण्यासाठी ही खास बातमी.
1. शिवनेरी किल्ला (Shivjayanti 2024)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. इथे शिवरायांचा जन्म झाल्यामुळे या किल्ल्याचे इतिहासात विशेष स्थान आहे. या ऐतिहासिक किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे आणि या देवीच्या नावावरूनच राजमाता जिजाऊ यांनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवल्याचे सांगितले जाते.
2. तोरणा किल्ला
शिवाजी महाराजांचा प्रताप आणि इतिहास सांगताना शिवनेरी नंतर पहिले नाव तोरणा किल्ल्याचे घेतले जाते. कारण शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. (Shivjayanti 2024) हा किल्ला पुण्यातील वेल्हे तालुक्यात आहे. हा किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यावेळी या किल्ल्याचे बांधकाम करताना शिवरायांना प्रचंड धन सापडले होते. ज्याचा उपयोग त्यांनी स्वराज्य बांधणीसाठी केल्याचे सांगितले जाते.
3. पन्हाळा किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड, किल्ले जिंकले. मात्र कोल्हापुरातील पन्हाळा किल्ल्याचा सुवर्ण इतिहासात विशेष उल्लेख आहे. स्वराज्याच्या निर्मितीत या किल्ल्याचे मोठे योगदान आहे. (Shivjayanti 2024) आदिल शहाने या गडाचे काही चबुतरे आणि दरवाजे करून घेतले आणि त्यानंतर इ.स.१६५९ रोजी शिवरायांनी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या अजस्त्र वेढ्यातून अगदी मोजक्या सहकाऱ्यांसोबत महाराज बाहेर पडले आणि विशाळगडावर सुखरूप पोहचले होते. पुढे हा किल्ला पुर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत त्याच्या दुरूस्तीचे काम थांबवले होते.
4. सिंहगड किल्ला
स्वराज्य स्थापनेत सिंहगड अर्थात पूर्वीचा कोंढाणा किल्ला अत्यंत महत्वाचा किल्ला ठरला. हा किल्ला पुण्यात स्थित आहे. इ.स.१६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकला होता. मात्र या लढाईत तानाजींना वीरमरण आले. त्यामुळे या किल्ल्याशी शिवरायांचे भावनिक नाते जोडले आहे.
(Shivjayanti 2024) आपल्या प्राणांची आहुती देऊन तानाजी मालुसरेंनी स्वराज्य स्थापनेसाठी मोठे बलीदान दिले होते. म्हणूनच हा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या तोंडी ‘गड आला पण सिंह गेला’ असे उद्गार आले. ज्यामुळे कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर ‘सिंहगड’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
असे हे किल्ले तेव्हा शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग आणि महत्वाच्या घटनांची आजही साक्ष देतात. त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्ताने या किल्ल्यांवर आवर्जून शिवप्रेमी गर्दी करतात. यावेळी गड- किल्ले स्वच्छ केले जातात. फुलमाळांनी सजवले जातात. शिवरायांच्या प्रतापाला आणि वीरगती पावलेल्या मावळ्यांना स्मरले जाते. त्यामुळे आज सर्व वातावरण शिवमय झाल्याचे पहायला मिळते. (Shivjayanti 2024)