खूशखबर! शिवनेरीच्या तिकीट दरात एवढी कपात, परिवहनमंत्री रावते यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये, नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू

मुंबई प्रतिनिधी | मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावलौकिक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत भरघोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवारपासून, म्हणजे ८ जुलैपासून लागू होणार आहेत.

गेली १५ वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची ‘शिवनेरी’ ही बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठित बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही प्रतिष्ठित सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचे श्री. रावते यांनी स्पष्ट केले. मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवासी वर्गसुद्धा शिवनेरीकडे वळेल .

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीसंदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दर कपात करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून कमी झालेले नवीन तिकीट दर लागू होतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Comment