मोदीजी पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत- शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा असून त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. कोरोनामुळे वाढलेला खर्च आणि लॉकडाउनमुळे ठप्प झालेलं उत्पन्न अशा कात्रीत सध्या राज्य सरकार अडकलं आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्याकडून विविध पर्यायांचा विचार सुरू असला तरी सर्वाधिक मदार केंद्राच्या मदतीवरच आहे. तशी मागणीही केंद्राकडे करण्यात आली आहे. याच मुद्याकडे शिवसेनेनं केंद्र सरकारचं लक्ष वेधत शरद पवार यांचा सल्ला ऐकण्याचे पंतप्रधान मोदींना म्हटलं आहे. महाराष्ट्रासारखे राज्य केंद्राच्या तिजोरीत मोठी रक्कम भरते. लॉकडाउनमुळे महाराष्ट्राला फटका बसला आहे. त्यामुळे देशाचा आर्थिक कणा असलेल्या महाराष्ट्राला बळकट करण्याचा सल्ला केंद्राला शिवसेनेनं दिला आहे.

नेमकं काय लिहलं आहे सामनाच्या अग्रलेखात

“रिझर्व्ह बँकेतल्या राखीव गंगाजळीस हात लावण्यापर्यंत देशाची अर्थव्यवस्था आधीच ढेपाळली होती. त्यात करोनाचे नवे कारण समोर आले आहे. अशा परिस्थितीत देशभरातील सर्व अर्थमंत्र्यांशीही पंतप्रधानांनी एकदा संवाद साधायला हवा. यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावरच सर्वाधिक खर्च करावा लागेल. या शर्यतीत बिहार, ओडिशा, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेशसारखी राज्ये कोठे असतील? केंद्राला सर्वाधिक बजेट याच क्षेत्रांवर खर्च करावे लागेल. त्यामुळे केंद्राला उत्पन्नाचे स्रोत नव्याने शोधावे लागतील. राज्यांचे खिसे कापून केंद्राला आपली बादशाही टिकवता-चालवता येणार नाही. हिंदुस्थान हे संघराज्यातून निर्माण झाले आहे. प्रत्येक राज्याचे स्वत:चे अर्थशास्त्र आहे. ते मजबूत करणे ही जबाबदारी पंतप्रधान म्हणून मोदी यांची आहे. राज्यांना मोडकळीस आणणे म्हणजे देश मोडण्यासारखे आहे. महाराष्ट्रासारखे राज्य तर देशाचा आर्थिक कणाच आहे. हा कणा मोडू नका. पवारांनी तेच सांगितले आहे.

पवारांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. आजमितीस शरद पवारांइतका राज्य चालविण्याचा अनुभव असलेला दुसरा नेता देशात नाही. अर्थविषयक विचार मांडणारे मनमोहन सिंग आहेत. ते बोलत असतात, पण शरद पवार यांच्या सांगण्यातले वजन आज महत्त्वाचे आहे. एक तर मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा. नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय विद्यमान सरकारने घेतले व अर्थव्यवस्था डबघाईला आली. काळा पैसा परदेशातून आणायच्या आणाभाका 2014 च्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांनी घेतल्या होत्या. पण त्या आणाभाका ‘भाकड कथा’ निघाल्याने कोरोनानंतरची हिंदुस्थानची अर्थव्यवस्था म्हणजे कसायाने खाटीकखान्यात ढकललेल्या भाकड जनावरासारखी झाली आहे,” अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारवर टीका करण्याबरोबरच उपदेशही दिले आहेत

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment