“काश्मीरमध्ये तिरंगा फडकणार नसेल तर जमिनीचे तुकडे घेऊन करायचं काय?” शिवसेनेचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काश्मीर मध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. म्हणजे तिथे दिल्लीचा हुकूम चालतो. 370 कलमाचा निचरा करूनही काश्मीरचा प्रश्न संपला नाही. काश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले. पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे? असा संतप्त सवाल शिवसेनेने मोदी सरकारला विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात यावरुन केंद्रावर टीका करण्यात आली आहे.

कश्मीर ही हिंदुत्वाची, धर्माची भूमी आहे. देव-देवतांची भूमी आहे. आता तिकडे जमिनी वगैरे खरेदी करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण चार दिवसांपूर्वीच श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखले. तिरंगा फडकवण्यास मज्जाव केला. पुणाच्या भावना दुखावतील म्हणून हा विरोध केला? तिरंगा फडकवल्याने वातावरण बिघडेल म्हणून विरोध केला का? जमिनी खरेदी करायच्या, पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकडय़ांचा उपयोग काय? असा थेट सवाल सामनातून करण्यात आला आहे.

काश्मीरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा कश्मीरचा प्रश्नही संपावा. काश्मीरच्या भूमीवर जितका रक्तपात झाला तेवढा आतापर्यंत भारताने लढलेल्या चार युद्धांतही झाला नसेल. मोदी हे दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री म्हणून बसले. त्यांनी एक काम केले. ते म्हणजे कश्मीरातील 370 कलम उडवून लावले.

‘35 अ’ कलम संपवले. लडाखला जम्मू-काश्मीरपासून तोडून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला. या घटनेस एक वर्ष झाल्यावर आता जम्मू-कश्मीरमध्ये बाहेरच्या लोकांना जमीन खरेदीस केंद्राने परवानगी दिली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळे ते एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगत होते. पुन्हा तेथील राजकीय पक्षांचा दोन दगडांवर पाय. त्यातला एक पाय पाकिस्तानात. भारताच्या केंद्रीय सरकारने मनासारखे केले नाही तर पाकिस्तानप्रेमाचे तुणतुणे वाजवून ‘ब्लॅकमेल’ करायचे हे आतापर्यंत चालले. ते काही प्रमाणात कमी झाले आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

जोपर्यंत पुन्हा 370 कलम काश्मीरात लावले जात नाही तोपर्यंत काश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा करणाऱ्या मेहबुबा मुफ्तीला अटक करून दिल्लीतील तिहार किंवा महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवायला हवे. किंबहुना त्यांची रवानगी अंदमानच्या कारागृहात करायला हवी एवढा त्यांचा अपराध भयंकर आहे अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment