हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पूरग्रस्तांचा दौरा करताना शिवसेनेच्या माजी आमदाराला गळाला लावले आणि पोटनिवडणुकीची उमेदवारी देखील दिली. फडणवीसांचा हा घाव शिवसेनेच्या चांगलाच वर्मी लागला असून याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून शिवसेनेने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’, त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? असा सवाल शिवसेनेने केला.
श्री. फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी व राज्याचे रखडलेले पैसे आपले वजन वापरून घेऊन यावेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेच. संकट अस्मानी आहे व त्याच्याशी एकजुटीने लढायला हवे. “आमचा मराठवाडय़ाच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केवळ प्रशासनाला जागे करणे, शेतकरयांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून प्रशासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आहे.” असे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांनी जाहीर केले. या त्यांच्या विधायक भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोड़ैच अस शिवसेनेने म्हंटल.
पंतप्रधान मोदी हे विरोधकांकडून नेहमीच विधायक भूमिकेची अपेक्षा करतात. विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत श्री. मोदी यांनी नुकतेच मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुपूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे. कारण मराठवाडय़ातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणारया फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साथलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर ‘व्हाया ओला दुष्काळ राजकारण, असाच झाला म्हणायचा! असेही शिवसेनेने म्हंटल.