अण्णा हजारे नक्की कोणाच्या बाजूने? हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या ; शिवसेनेचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी नंतर अण्णांनी उपोषण सुरू करण्याअगोदरच ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अण्णांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातुन अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात प्राणार्पण करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला कळायला हवीत,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

‘अण्णांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढायचं आणि नंतर ते म्यान करायचं असं यापूर्वीही घडलं आहे. त्यामुळं आताही ते घडलं तर त्यात अनपेक्षित असं काही नाही. भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळं अण्णांचं समाधान झालं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न कृषी कायद्याची दहशत आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील दडपशाहीचा आहे. या संदर्भात अण्णा निर्णायक भूमिका घेत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र अण्णांनी उपोषण मागं घेतलं आहे. त्यामुळं कृषी कायद्यांबाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मुळात उपोषणाचा इशारा देण्यामागचा अण्णांचा नेमका हेतू काय होता? कृषी कायदे रद्द करावेत असं आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अण्णा हजारे यांचं उपोषण शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी होतं काय हे स्पष्ट झालेलं नाही. तसं असतं तर त्यांना मोदी सरकारविरोधात उघड भूमिका घ्यावी लागली असती. राळेगणमध्ये मनधरणीसाठी येणाऱ्या भाजपच्या पुढाऱ्यांना तसं स्पष्ट शब्दांत सांगावं लागलं असतं.

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णांनी दोन वेळा दिल्लीत जंगी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचं काम तेव्हा भाजप करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळं जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय? असा थेट सवाल करत शिवसेनेने अण्णा हजारेंवर तोफ डागली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment