Sunday, May 28, 2023

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी आणि बार्कचे माजी कार्यकारी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‌ॅप चॅट उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर तांडव वेबसिरीजवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तांडवचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले. पण जवानांच्या हौतात्म्यचा अपमान करणाऱ्या गोस्वामींविरोधातही भाजप असे गुन्हे दाखल करणार असेल तर ते खरे मर्द,” अशा खरमरीत शब्दांत शिवसेनेने भाजपला डिवचले आहे

राष्ट्रीय स्तरावरील मीडियावरही शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं आहे. ‘शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून ‘तांडव’ करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर ‘राष्ट्रीय बहस’ करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे. स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा आणि हे राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार. हे लोक स्वतःला राष्ट्राचा चौथा स्तंभ समजतात. मग त्यांच्यातल्याच एका वाळवी किड्याने देशाचा स्तंभ पोखरला, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातली गुपिते फोडली, त्याने देशद्रोहच केला तरी ‘मीडिया’ थंड का?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

हिंदू देवदेवतांच्या अवमानप्रश्नी कोणतीही तडजोड शक्यच नाही, पण भाजपनं जे ‘तांडव’ सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण ‘तांडव’विरोधात उभा ठाकलेला भाजप भारतमातेचा अवमान करणाऱ्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसला आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील अनेक गुपिते गोस्वामीने फोडली. यावर भाजप तांडव का करीत नाही? चीनने लडाखमध्ये घुसून भारताच्या जमिनीचा ताबा घेतला, यावर ‘तांडव’ का होत नाही? असा थेट सवाल शिवसेनेने विचारला आहे.

एकतर ‘पुलवामा’तील आमच्या सैनिकांची हत्या हा देशांतर्गत राजकीय कट होता आणि लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी या ४० जवानांचे रक्त सांडवले गेले असे आरोप त्यावेळीही झाले. आता अर्णब गोस्वामीच्या व्हॉटस्ऍपवरील जे काही संभाषण बाहेर आले आहे, ते या आरोपांना बळकटी देणारेच आहे असे म्हणायला जागा आहे. हे सगळे पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीरामही कपाळावर हात मारून घेत असतील. पुन्हा भारतीय जनता पक्षाने यावर ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील अनेक गुपिते या गोस्वामीने फोडली. यावर भाजप तांडव का करीत नाही?,” असा सवाल शिवसेनेनं भाजपाला केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’