गोवा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवार यादी जाहीर; आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर कसली असून आज आपल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच गोव्यात आदित्य ठाकरे हे पक्षाच्या प्रचारासाठी येतील असेही राऊत म्हणाले.

आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. संजय राऊत म्हणाले की, “गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा नवा पक्ष नाही. आपण गेल्या काही वर्षांपासून पाहताय, जरी काही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं, तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करतेय.

शिवसेने कडून पणजीतून शैलेश वेलिंगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्पल पर्रीकर जर पणजी मधून अपक्ष लढले तर शिवसेनेचा उमेदवार अर्ज मागे घेईल असे राऊत यांनी म्हंटल. याशिवाय पेडणेतून सुभाष केरकर, म्हापसातून जितेश कामत, शिवली- भीमसेन परेरा, हळदोणे- गोविंद गोवेकर, परयेमधून गुरुदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर आणि  केपेमधून अॅलेक्सी फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा शिवसेने कडून करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते गोव्यात प्रचाराला येतील,  युवासेनेचे प्रमुख नेते येतील, तर काही मतदार संघात शिवसेनेचे युवा मंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: प्रचारात उतरतील अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.