नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन शिवसेनेने संधीसाधू राजकारण केलं आहे- ओवेसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र ।  लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने मतदान केल्यानं त्यांच्या भूमिकेवर आता एआयएमआयएमचे खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. शिवसेनेचे भांगडा राजकारण सुरु आहे असा शाब्दिक वार करत ओवेसी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केली तेव्हा सेनेने सेक्युलर हा शब्द त्यांच्या किमान समान कार्यक्रमात लिहिला. मात्र हे बिल धर्मनिरपेक्षतेविरोधात आहे. सोबतच हे विधेयक संविधानातील कलम १४ चे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळं शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा देऊन संधिसाधूपणाचे राजकारण केलं आहे असे म्हणत ओवेसी यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत बहुमतानं मंजुर झालं, यावेळी शिवसेनेनेही याला पाठींबा दिला होता. त्यामुळं दिल्लीतील तसेच राज्यातील काँग्रेस नैतृत्व शिवसेनवर नाराज झाल्याचे दिसून आले. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेतला असता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचं असल्यानं शिवसेनेनं त्याला पाठींबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं.

“राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे,” असंही ते म्हणाले होते.

दरम्यान, या विधेयकाला पाठिंबा देल्यानंतर शिवसेना सध्या गोंधळात असलयाचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने लोकसभेत जरी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं असलं तरी राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाण्यापूर्वी त्यामध्ये सुचवलेल्या सुचनांची दखल घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.त्याचबरोबर याविधयेकाबाबत अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

 

Leave a Comment