कोल्हापूर : निपाणीच्या मराठी साहित्य संमेलनाला कर्नाटक पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे मराठी भाषिक व साहित्यीकांच्या विषयी कर्नाटक पोलीस दडपशाही करत आहे. ती दडपशाही कदापिही चालू देणार नाही, असा इशारा देत कर्नाटक सरकारचे श्राद्ध घालून शिवसेनेने निषेध केला. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पात्राजवळ आंदोलन झाले. या आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही राज्यांतील पोलिस कुमक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती.
निपाणीतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस भूषवणार होते. ग्रामीण कथाकार बबन पोतदार, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेनगे, निवृत्त पोलिस उपाधिक्षक शिवाजीराव फाटक, साहित्यप्रेमी प्रदीप शिंगवी, मुकुंदराव महामुनी, आत्माराम हारे, चंद्रकांत जोगदंड यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी कर्नाटकात साहित्य संमेलन होणार होते. मात्र, कर्नाटक सरकारने पोलिसांकरवी दडपशाही केली.