हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटरवर वॉर पाहायला मिळाल्यानंतर विरोध करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी कंगना येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुनच शिवसेनेने आता केंद्रावर निशाणा साधत महाराष्ट्र सरकारला विरोध करण्यासाठी केंद्र अंडर वर्ल्ड डॉन डाऊद इब्राहिमलाही व्हाय दर्जाची सुरक्षा देईल असं म्हटलं आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र सरकारला विरोध करण्यासाठी केंद्र सरकार हे सर्व करत असल्याचं म्हटलं आहे. “उद्या महाराष्ट्र सरकारने किंवा एखाद्या मंत्र्याने दाऊदविरोधात वक्तव्य केलं तर केंद्र सरकार दाऊदलाही एक्स किंवा व्हाय दर्जाची सुरक्षा देईल. महाराष्ट्र सरकारला विरोध करणं एवढंच त्यांच धोरण आहे,” अशा शब्दांमध्ये सरनाईक यांनी कंगनाला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.
“महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारला खूपच प्रेम असल्याचे दिसून येत आहे. महिला आयोगाला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटनांची दखल घेता येत नाही,” असा टोलाही सरनाईक यांनी लगावला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाचे थोडाब फोडल्याशिवाय राहणार या सरनाईक यांच्या वक्तव्यावरुन त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी हा टोला लगावला आहे. आज मुंबईमध्ये अनेक पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तरीही ते आपल्या कर्तव्य पार पाडत आहेत. असं असतानाही त्यांच्यावर विश्वास नाही असं म्हटलं जात असेल तर ते योग्य नाही, असं मतही सरनाईक यांनी व्यक्त केलं.