चंद्रकांतदादा मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे राणेंना विचारा; शिवसेना नेत्याची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा कसा शेवट होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला. ते सोमवारी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. क्षीरसागर म्हणाले कि, ”चंद्रकांत पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे पक्षात अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर विचारपूर्वक टीका करावी,” असे क्षीरसागर यांनी म्हटले.

याशिवाय चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी नरेंद्र मोदींनी गेल्या ६ वर्षात मीडियाला बाईट दिला का, हे सांगावे, असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली होती. कोरोनाच्या काळात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यासाठी आगामी काळात भाजपकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच आपल्यावर करण्यात येणाऱ्या वैयक्तिक टीकेलाही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. कोणावरही केलेलं वक्तव्य खपवून घेतलं जाऊ नये. कुणी चंपा म्हणतं, कुणी कुत्रा म्हणतं. त्यामुळे आता आक्रमक व्हावे लागेल, असं चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment