शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर आनंदाची बाब आहे, पण….संजय राऊतांनी वर्तवली ‘ही’ शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशा बातम्या काल रंगल्या होत्या. पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता या विषयावर भाष्य करताना परखड मत मांडले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार युपीएचे अध्यक्ष होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही”.

ते पुढे म्हणाले, “नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचं पद ते मिळवू शकले नाहीत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल. ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’