गुणरत्न सदावर्तेला भाजपचे पाठबळ; संजय राऊतांचा थेट आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सदावर्ते यांना भाजपचे पाठबळ आहे असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे

संजय राऊत यांनी आज ‘सिल्वर ओक’वर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, गुणरत्न सदावर्ते याला भाजपाचं पाठबळ आहे. तो कुठे राहतो. कुणाच्या घरात राहतो. आर्थिक रसद कोण पुरवतं याची कल्पना सर्वांना आहे. कालचा हल्ला हा त्याचाच एक भाग होता”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.  पवारांच्या घरावर झालेलं आंदोलन नव्हतं. तो हल्ला होता आणि त्यात एसटीचे कर्मचारी नव्हते. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. याची पाळंमुळं गृहमंत्र्यांनी शोधून काढावीत असेही संजय राऊत यांनी म्हंटल.

दरम्यान, घटनेमागे कोण आहे, त्याचा तपास केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आंदोलक कसे घुसले, गुप्तचर विभागाला त्याची काही माहिती मिळाली नाही का, याचाही तपास केला जाईल. तशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.