भाजपवाले एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सामनातील रोखठोक सदरातून ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला, यावर परप्रांतीय लोकांची भूमिका मांडली असून भाजपवर टीका केली आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याची आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशावर भाजपनं सडकून टीका केली होती. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. एक दिवस भाजपचे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला.

महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. तशी ती आता फुटलेली दिसत आहे. परप्रांतीयांचा विषय हा फक्त एखादे राज्य किंवा मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या शहरांचा राहिलेला नाही. तो राष्ट्रव्यापी विषय बनला आहे. भूमिपुत्रांचा लढा व परप्रांतीयांची समस्या हे दोन्ही वेगळे विषय आहेत. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले. बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली, त्यावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणारया प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. असे राऊतांनी म्हंटल.

परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. श्री. ठाकरे यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे किंवा भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला. मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे? मुंबईत दंगली घडवणारे, बॉम्बस्फोट घडवणारे, दहशतवादी कारवायांना हातभार लावणारे, महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व येथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप ‘परप्रांतीय प्रेमा’चे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही.

आपल्या राज्यात कोणी बाहेरचे येऊन घाण करीत असतील तर घाण करणारयांच्या मुसक्या आवळणे हे राज्य सरकारचे काम आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक साळसूद प्रश्न विचारला आहे. “परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?” मराठीद्वेष भाजपातील मराठी नेत्यांच्या रोमारोमांत कसा भिनला आहे ते या एका वाक्यात दिसते! शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांवर ‘ईडी’चा ससेमिरा लावता, मग भाजपचे सर्व पुढारी धुतल्या तांदळासारखे आहेत काय? ‘ईडी’ त्यांच्यामागे का लागत नाही? आर्थिक गुन्हे फक्त शिवसेना, राष्ट्रवादीचेच लोक करतात काय? हे चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या प्रश्नाचे रोख उत्तर आहे. असे म्हणत भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे असे राऊतांनी म्हंटल.

Leave a Comment