भाजपच्या आधी शिवसेनेचा जन्म; राऊतांनी इतिहासाचा पाढाच वाचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचा जन्म होण्यापूर्वीच मुंबईत आमचा नगरसेवक होता असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारल असता राऊतांनी इतिहासाचा पाढाच वाचत फडणवीसांचे सर्व आरोप खोडुन टाकले.

भाजपाचा जन्म हा १९८० च्या दशकात झालेला आहे जनता पक्षाचं पतन झाल्यावर आणि शिवसेनेचा जन्म हा १९६९ चा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर या मुंबईत शहरात डॉ. गुप्ते हे कधी झाले, त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबिर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत ठेवू असा टोला राऊतांनी लगावला.

रामजन्मभूमी आंदोलनाच्या मुद्यांवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, कोणी काहीही म्हणत असलं तरी हा इतिहास आहे. दस्तावेज आहेत. रेकॉर्ड्स आहेत. सीबीआय न्यायालयासमोर जे विशेष न्यायालय निर्माण झालं, त्याच्यासमोरील साक्षी-पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना आरोपी आणि गुन्हेगार केलं होतं त्यामध्ये. लालकृष्ण अडवाणीबरोबर बाळासाहेब ठाकरे हे त्यातले आरोपी आहेत. मग ते कोर्ट मूर्ख होतं का?

औरंगाबादच्या नामकरणा वरून फडणवीसांनी डिवचल्या नंतर त्यावरही राऊतांनी समाचार घेतला. फडणवीसही 5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते औरंगजेबाला कवटाळून बसले होते का ? असा सवाल राऊतांनी केला आहे. एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल तर केंद्राची परवानगी लागते. गेल्या काही वर्षापासून सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. केंद्राने का परवानगी दिली नाही? हे विचारावे लागेल. असेही ते म्हणाले.