औरंगजेब नक्की कोणाला प्रिय ?? ; रोखठोक मधून राऊतांचा काँग्रेसवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. यावरूनच महाविकास आघाडीत ठिणगी पडली असून आज सामनातील रोखठोख या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

हिंदुस्थानची घटना ‘सेक्युलर’ आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात? औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढय़ाचे नेतृत्व आधी छत्रपती शिवाजीराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यामुळे सच्च्या मर्‍हाटी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही अस संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच,” असं म्हणत राऊत यांनी नामांतर करण्याच्या मुद्द्यावर जोर दिला आहे.

महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचयला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा सेक्युलर कधीच नव्हता. त्याने शिवाजी महाराजांचा शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचा भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे!’ अशा शब्दात संजय राऊत यांनी आपलाच सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment