काँग्रेसने सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकायला नको होता- शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा घेतलेला राजीनामा आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा यामुळे पंजाब काँग्रेस मध्ये खळबळ उडाली असून काँग्रेस अडचणीत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत काँग्रेसला काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. आधीच बोलघेवडे लोक असताना काँग्रेसने सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकायला नको होता असेही शिवसेनेने म्हंटल.

पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात.

नरेंद्र मोदींच्या वादळापुढे भाजपाच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाली आणि काँग्रेसच्या वाड्यातले उरले-सुरले वतनदार देखील सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा मुळापासू हादरला आहे. कॅप्टन अमरिंदर यांना काँग्रेस श्रेष्ठींनी पदावरून दूर केलं. प्रदेशाध्क्ष नवजोतसिंग सिद्धूंनी पेढे वाटत भागडा केला. पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढचं संकट वाढवलं. सिद्धूंच्या सततच्या कटकटीमुळे अमरिंदर यांना दूर केलं. आता सिद्धूही गेले काँग्रेसच्या हाती काय उरलं?” असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.

तिकडे 79 वयाचे कॅ. अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. कॅ. अमरिंदर हे भाजपात जातील, असे सांगितले जात होते, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्डय़ात टाकतील, असे दिसत आहे.

कॅ. अमरिंदर म्हणतात, ‘मी तीन कृषी कायद्यासंदर्भात अमित शहांची भेट घेतली.” हे सपशेल झूट आहे. मुख्यमंत्री असताना हेच अमरिंदर पंजाबच्या शेतकऱ्यांना सांगत होते, आंदोलन पंजाबात करू नका, तर दिल्लीत करा. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची ही आक्रमकता स्वराज्यात नको होती. मुख्यमंत्री असताना कॅ. अमरिंदर हे तीन कृषी कायद्यासंदर्भात किती वेळा दिल्लीत आले?

उलट त्यांची भूमिका मोदी सरकारधार्जिणी व शेतकऱ्यांत फूट पाडण्याची होती असे सांगतात. आता हे महाराज शेतकऱ्यांचे कैवारी बनले. कॅ. अमरिंदर यांना केंद्रीय कृषी मंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ज्यांचे वय 75 झाले. त्यांना सत्तेचे पद मिळणार नाही, असे मोदींचे धोरण आहे. कॅ. अमरिंदर यांचे वय 79 आहे. तेव्हा कसे काय होणार?असा सवाल शिवसेनेने केला.

Leave a Comment