बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला ; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्याकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी 83 वर्षांचे  रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय? असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

सध्या आपल्या देशात नक्की काय सुरू आहे ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते हिंदुस्थानातच आहेत, पण हिंदुस्थानातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला आहे.

देशभक्तीची नवी लस सध्याच्या राज्यकर्त्यांनी लोकांना टोचली आहे. त्या लसीचा परिणाम असा की, सध्या आपल्या देशात प्रचाराचा, विकासाचा, विचाराचा मुद्दा म्हणजे देशभक्ती हाच बनला आहे. जणू काही ‘देशभक्ती’ या शब्दाचा उदय 2014 नंतर झाला. त्याआधी शतकानुशतके देशभक्ती कशाशी खातात हे हिंदुस्थानवासीयांना माहीत नव्हते. स्वातंत्र्य संग्रामात जे सहभागी झाले व मरण पावले तेसुद्धा सध्याच्या युगात देशभक्त नसावेत. पंतप्रधान मोदी व भाजपचा जयजयकार करीत आहेत तेच देशभक्त असे आता नक्की करण्यात आले आहे’ असा टोलाही राऊत यांनी लगावला.

आज देश व राजकारण एका व्यक्तीभोवती फिरत आहे. लोकसभेचे तरी सार्वभौमत्व उरले आहे का? लोकसभेच्या सार्वभौमत्वाची जागा पंतप्रधानांच्या सार्वभौमत्वाने घेतली आहे. गेल्या काही वर्षात एकामागून एक घटनादुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या, पण दिल्लीच्या सीमेवर 45 दिवस मरत असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी कायद्यात दुरुस्ती करायला सरकार तयार नाही. कृषी कायदे मागे घ्या ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असेलही, पण त्यावर लोकसभेत चर्चा तरी होऊ द्या! सध्या काय सुरु आहे त्याची तुलना आणीबाणीशीच करता येईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment