ममता बॅनर्जी यांचा विजय म्हणजे भाजपच्या मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक ; शिवसेनेचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला आणि मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला जोरदार हादरा दिला. ममता बॅनर्जी यांनी 200 पेक्षा अधिक जागा जिंकत बंगाल मध्ये एकहाती सत्ता काबीज केली. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार टोलेबाजी करत भाजपवर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांचा हा विजय म्हणजे भाजपच्या मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली .

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत व त्यांच्या बोलघेवडेपणावर शहाणीसुरती जनता विश्वास ठेवेलच असे नाही.

प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या जनतेचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच. प. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही. आपल्या मातीतील माणसांच्या प्रतिष्ठेसाठी बंगाली जनता ठामपणे उभी राहिली. देशाने प. बंगालकडून शिकावे, असा प्रसंग घडला आहे! असे शिवसेनेनं यात म्हटले आहे.

प. बंगालात ममतांचा पराभव करण्यासाठी भाजपने काय करायचे बाकी ठेवले? ‘जय श्रीराम’चे नारे देण्यापासून ते ममतांना ‘बेगम ममता’ असे डिवचण्यापर्यंत हिंदू-मुसलमान मतांचे ध्रृवीकरण करण्याचा चोख हातखंडा प्रयोगही सफल झाला नाही. जेथे हिंदूंचे मताधिक्य आहे त्या मतदारसंघांतही ममता बॅनर्जी यांनी विजय मिळविला. या काळात पंतप्रधान मोदी हे बांगलादेशातही सैर करून आले. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबूर रेहमान यांना गांधी शांतता पुरस्कार जाहीर करून तो त्यांच्या कन्या बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांना प्रदान करून आले. त्यामुळे प. बंगालातील मुसलमान मते मिळतील असा कयास असावा, पण तसे घडले नाही.

प. बंगालातील ममतांचा विजय हा मोदी-शहा-नड्डांचा दारुण पराभव आहे व या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवायला हवे. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे.

प. बंगाल जिंकता यावे म्हणून तेथे मतदानाच्या आठ फेऱया लादण्यात आल्या. पण झाले काय? तृणमूल काँग्रेसने मोदी, शहांसह संपूर्ण केंद्र सरकार व भाजपला धूळ चारली आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. इतकेच नव्हे, तर मोदी-शहांनी उभे केलेले तुफान रोखत भाजपचा डाव शंभरच्या आत ‘ऑल आऊट’ करून टाकला. ममता दीदी 2 मेनंतर घरी जातील अशा गमजा केल्या गेल्या. ‘2 मई दीदी गई’ असा घोषा पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून लावत होते. ममता यांना घरी बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैसा, सत्ता व सरकारी यंत्रणेचा पूरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळविला. हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली .

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment