महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील; शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ‘प्राणवायू’चे राजकारण झालेय तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील” असं म्हणत शिवसेनेचे आपल्या सामना मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायू देऊन केंद्रातले सरकार मोठीच मेहेरबानी करत आहे काय?,  राज्याच्या कायदा व्यवस्थेची, आरोग्य यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचे हे कारस्थान तर नाही ना? महाराष्ट्र संकटात असताना केंद्रातले मंत्री दिल्या-घेतल्याच्या हिशेबाच्या चोपडय़ा फडकवून महाराष्ट्राला त्रास देत आहेत” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिव्हीरचा साठा विकत घेतात. त्या कंपन्या हा साठा परस्पर उपलब्ध करुन देतात हा अपराधच आहे. पण ही साठेबाजी व काळाबाजारी कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागले. भाजपने हा रेमडेसिव्हीरचा साठा म्हणे विकत घेतला. मग हा साठा राज्य सरकारला का मिळू नये? केंद्राचा चाप लागल्याशिवाय फार्मा कंपन्या अपराध करायला प्रवृत्त होणार नाहीत.

विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका फार्मा कंपनीच्या मालकाच्या सुटकेसाठी मध्यरात्रीच पोलीस ठाण्यावर धडकतात यास काय म्हणावे? अशावेळी विरोधी पक्षनेते महाराष्ट्राची वकिली करण्याचे सोडून महाराष्ट्राला औषधे नाकारणाऱ्या फार्मा कंपनीची वकिली करत आहेत. हे असे महाराष्ट्रात यापूर्वी कधीही घडले नव्हते, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते महाराष्ट्राची वकिली करण्याचे सोडून महाराष्ट्राला औषधे नाकारणाऱया फार्मा कंपनीची वकिली करीत आहेत. हे असे कधी महाराष्ट्रात पूर्वी घडले नव्हते. राज्याच्या कायदा व्यवस्थेची, आरोग्य यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचे हे कारस्थान तर नाही ना? ‘आप’च्या प्रीती शर्मा मेनन यांच्या म्हणण्यानुसार राजकीय पक्ष हे इलेक्शन कमिशनला नोंदणीकृत असतात, धर्मादाय आयुक्तांशी त्यांचे संबंध नाहीत. कोणत्याही प्रकारच्या डोनेशनसाठी एखाद्या राजकीय पक्षाने ड्रग्ज, औषध विकत घेणे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. भाजपने औषधांची साठेबाजी करून नक्की काय करायचे ठरवले होते? भाजपने रेमडेसिवीर औषध विकत घेऊन फक्त त्यांच्या ‘कोरोनाग्रस्त’ कार्यकर्त्यांनाच वाटायचे ठरवले होते की काय? हे सगळे प्रकरण चिंताजनक आहे.

राजकारण कुठे करावे व कुठे करू नये याबाबत एखादा नैतिकतेचा धडा शालेय क्रमिक पुस्तकात नक्कीच असावा असे आता वाटते व हे धडे सगळय़ांसाठीच असावेत. महाराष्ट्रासह देशभरात प्राणवायूअभावी कोरोना रुग्णांचा प्राण गुदमरला आहे. रेमडेसिवीरअभावी चिता पेटल्या आहेत. त्या चितांवर कोणीच राजकीय तवे शेकवू नयेत. सरकार व विरोधकांनी निदान याप्रश्नी तरी एकमताने वागावे,” असं आवाहन शिवसेनेने केलं आहे.

You might also like