ही तर मोदी सरकारच्या कर्माची फळे ; शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. ‘प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य या कठीण काळात दाखविले असते तर आजची कोंडी थोडी सैल झाली असती. आज परिस्थिती बिघडत चालली आहे. ही सरकारच्याच कर्माची फळे आहेत,’ असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

समाजात जाती-धर्माची फूट पाडून सध्या निवडणुका जिंकणं सोपं आहे, पण दिल्लीच्या वेशीवर थडकलेल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीत फूट पाडणे जमत नसल्याने सरकार कोंडीत सापडलं आहे. सरकारमध्ये निवडणुका जिंकून देणारे, विजय विकत घेणारे लोक आहेत, पण शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी-सुलतानी संकट, बेरोजगारी अशा आव्हानांशी दोन हात करणाऱ्या तज्ञांची कमतरता आहे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य सरकारने दाखवलं असतं तर आजची कोंडी थोडी सैल झाली असती. आज परिस्तिथी बिघडत चालली आहे. ही सरकारच्याच कर्माची फळे आहेत अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. इतकंच नाही तर यावेळी ‘कृषी कायदा रद्द होणार की नाही? होय की नाही तेवढंचं सांगा!’ सरकार यावर मौन पाळून आहे पण शेतकऱ्यांचे यामध्ये हाल होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

एकेकाळी सरकारमध्ये प्रमोद महाजन, अरुण जेटली, सुषमा स्वराज असे संकटमोचक होते. एखाद्या संकटकाळात सरकारचे प्रतिनिधी म्हणून यापैकी कोणीही पुढे गेले की, त्यांच्याशी संवाद होत असे व तिढा सुटत असे. आज सरकारमध्ये असा एकही चेहरा दिसत नाही. त्यामुळं चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत आहेत, असेही सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

केंद्र सरकार देशी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून शेतकरी, कष्टकरी वर्गास लाचार बनवीत आहे. त्या संभाव्य गुलामगिरीविरुद्ध उडालेला हा भडका आहे, पण स्वाभिमान व स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शेतकऱयांना खलिस्तानी किंवा अतिरेकी ठरवून मारले जात असेल तर देशात असंतोषाचा भडका उडेल असा इशारा देखील शिवसेनेने भाजपला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment