ट्विटरच्या बळावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का? शिवसेनेचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वादात शिवसेनेने उडी घेतली असून केंद्र सरकार वर सडकून टीका केली आहे. कालपर्यंत ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. याच सोशल मीडियाच्या बळावर 2014 साली भाजप सत्तेत आला. मात्र, आता ट्विटरचाच वापर करुन विरोधकांनी तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यामुळे भाजपच्या  ट्विटर सेनेची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून हे ओझे कायमचे फेकून द्यावे, या निर्णयाप्रत मोदी सरकार आल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ‘ट्विटर’ वगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या. जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपावाल्यांना गुदगुल्या होत होत्या, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले तेव्हा भाजपाच्या तंबूत घबराट झाली. असे शिवसेनेने म्हंटल.

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विटरवर झोकात लिहिले, ‘‘मोदीजी, देशाची जनता गेल्या सात वर्षांपासून खात्यात १५ लाख जमा होण्याची वाट पाहत आहे. आपणास अर्धा तास वाट पाहावी लागली तर मनावर का घेता?’’ हे व असे अनेक शब्दबाण सरकार किंवा भाजपावर सुटत आहेत आणि भाजपा त्याबाबतीत आक्रोश करीत आहे. विरोधकांची बदनामी करण्यासाठी लाखो फेक ट्विटर अकाऊंट उघडून आतापर्यंत मोठाच खेळ सुरू होता. तेव्हा कोणतेही नियम व कायदे आडवे आले नाहीत.

महाराष्ट्रात शिवसेना, काँगेस व राष्ट्रवादीची तरुण पोरे सायबर लढाईत तरबेज झाली असून, प्रत्येक युद्धात भाजपाच्या बदनामी मोहिमांना हाणून पाडले जात आहे. पंतप्रधान मोदी व त्यांचे केंद्रीय सरकार करोना काळात कसे अपयशी, कुचकामी ठरले आहे हे जगभरात पोहोचवण्याचे काम यावेळी ‘ट्विटर’सारख्या माध्यमांनी केले. . ही अशी पोलखोल झाल्यामुळेच ‘ट्विटर’ हे एक जागतिक षड्यंत्र आहे, ट्विटर म्हणजे देशाला बदनाम करण्याचा, अस्थिर करण्याचा ‘परकीय हात’ आहे, असे आपल्या राज्यकर्त्यांना वाटू लागले तर ते स्वाभाविक आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment