नेहरू- गांधींनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेमुळेच देश आजही तग धरून आहे- शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कान टोचले आहेत. या कोरोना काळात देखील देश तग धरून राहिलाय तो ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच. ती पुण्याई मोठी आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदी यांना देश सावरण्यासाठी कठोर परिश्रम व राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल. असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

भारतापासून जगाला धोका असल्याची चिंता आता ‘युनिसेफ’नेही व्यक्त केली आहे. कोरोना ज्या वेगाने भारतात पसरत आहे त्यापासून संपूर्ण जग संकटात येईल. त्यामुळे भारताला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी जास्तीत जास्त मदत करावी, असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे. बांगलादेशने भारताला 10 हजार रेमडेसिवीर वायल्स देणगी दाखल पाठवले. भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकासारखे देशही आत्मनिर्भर भारताला मदतीचा हात पुढे करीत आहेत. स्पष्ट सांगायचे तर आजही भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर. नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते. असे सामनातून सांगण्यात आले आहे.

भारतातील पेटलेल्या चितांचा धूर आजूबाजूच्या देशांना गुदमरून टाकत आहे. या धुरातून कोरोना आपल्या देशात पसरू नये यासाठी अनेक गरीब देशही भारताला दयाबुद्धीने मदत करू लागले आहेत. कधीकाळी ही वेळ पाकिस्तान, रवांडा, कोंगोसारख्या देशांवर येत असे. आज राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱया भारतावर आली.

गोरगरीब देश आपल्याला त्यांच्या ऐपतीने किडुकमिडुक मदत करीत असले तरी आपले सन्माननीय पंतप्रधान महोदय 20 हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात पंतप्रधानांचा  नवाकोरा महाल या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या देशांकडून कोरोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत कोणाला वाटू नये याचे आश्चर्य वाटते, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment