हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर NDA नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करत आहे. या दोन्ही नेत्यांच्या सोबतीशिवाय सत्तास्थापन भाजपला शक्य नाही. मात्र इंडिया आघाडीत न जाता भाजपलाच या दोन्ही नेत्यांनी आपला पाठिंबा कायम ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून चंद्राबाबू नायडू याना खास सल्ला देण्यात आलाय. मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा शत्रुत्व केले तर ते फायद्याचं ठरतं. मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो, त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात काय म्हंटल?
नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता व संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत. भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निकालांनी मोदी यांना जमिनीवर आणले. ‘मोदी सरकार’, ‘मोदी गॅरंटी’, ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘मोदी तो भगवान है,’ अशा फेकू कल्पनांना कालच्या निकालांनी केराची टोपली दाखवली. मोदी यांनी सरकार बनवलेच तर त्यांचे चित्र हे एक व्यंगचित्र असेल. संपूर्ण शरीरभर फॅक्चर व प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही असं सामनातून म्हंटल आहे.
आता मोदींचे सरकार नाही, तर एनडीएचे सरकार बनवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसे झाले तर मोदी यांना अनेक कुबडय़ांच्या अटी-शर्तीवर काम करावे लागेल. मोदी आतापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते, पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपविण्यासाठी एनडीएच्या चरणी आणले. मोदींना या वेळी राम पावला नाही. कारण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे व अहंकाराचा पराभव करून त्याने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 240 जागा हा ‘मोदी’ ब्रॅण्डचा चमत्कार नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपने हा आकडा गाठला. मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा व अनेक रोड शो केले. 18 पैकी 14 जागांवर भाजपचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षाचा ‘आरोप’ होता की, महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले. भाजपचा हा भ्रम या वेळी लोकांनी तोडला. उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले व शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार विजयी झाले. उलट महाराष्ट्रात ‘मोदी मोदी’ करणाऱ्यांचा आकडा 23 वरून 9 वर आला.
मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी शत्रुत्व केले तर ते फायद्याचे ठरते. मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो हा अनुभव आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे. बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला आहे. बाबूंना संपवायचा प्लॅन त्यांच्या डोक्यात घोळतच असेल. नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने दहा वर्षे दिल्लीत मोदी यांच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. दहा वर्षांनी ओडिशातून नवीन पटनायक व बिजू जनता दलास भाजपने संपवून टाकले. पटनायक हे वनवासातच गेले. देशभरात भाजपने हेच आणि हेच केले. भाजप हा मिठाला व शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्याबाबतीत प्रख्यात आहेत. मोदी यांचे भारतीय सभ्यता व संस्कृतीशी नाते नाही हे चंद्राबाबू वगैरे लोकांना माहीत आहेच, पण बाबू यांनीही राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यता व लोकशाहीला इजा पोहोचेल असे कृत्य ते करणार नाहीत. मोदी यांना तिसरयांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार व चंद्राबाबूंचा वापर करतील, पण ही तिसरी ‘कसम’ म्हणजे मोदी- भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल. पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहत आहे.