किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी शिवसेना नेत्याला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटायला खार पोलीस स्टेशनमध्ये गेले असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या प्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी महाडेश्वर यांना ताब्यात घेतले आहे.

खार पोलीस ठाण्याच्या परिसरात किरीट सोमय्या यांच्या कारवर दगडफेक झाली होती. या दगडफेकीत कारची काच फुटून ती सोमय्या यांच्या हनुवटीवर लागली होती. यात ते जखमी झाले. सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर राज्यातील भाजप आक्रमक झाली होती. सोमय्यांनी वांद्रे पोलिसांकडे हल्लाप्रकरणाचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कोणत्याही परिस्थितीत या हल्ल्या मागील सुत्रधार कोण यासाठी विरोधकांनी पोलिसांवर दबाव आणला होता. अखेर याप्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक केली.

विशेष म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर यांनीच 2 दिवसांपूर्वी पोलिसांकडे सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल करत सोमय्यांनीच शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप केला होता.