मुंबई । शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करुन काम केले तर आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील, असा विश्वास खासदार अनिल देसाई यांनी केले. ते शुक्रवारी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी अनिल देसाई यांनी आगामी काळात शिवसेना राष्ट्रीय स्तरावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत दिले. शिवसेना बलाढ्य तर राज्य बलाढ्य ही संकल्पना घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. देशाच्या पंतप्रधानपदी शिवसैनिक बसेल, असे काम करुयात असं आवाहनही अनिल देसाई यांनी शिवसैनिकांना केलं.
तत्पूर्वी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही भविष्यात उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा आणखी प्रभावी करण्याचे संकेत दिले. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या या विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. वादळामागूनी वादळं आली तरी शिवसेनाच एक वादळ आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.
आज कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. शिवसेनाच एक वादळ आहे. अशी कितीही वादळे आली तरी हे भगवे वादळ कायम राहणार आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचे कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, उद्धव ठाकरे म्हणालेत.